छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वचनबद्ध करिता जल जीवन मिशन अंतर्गत योजना गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
हा दिवस ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा लोकसहभाग अधिक दृढ करणे, पाणीपुरवठा योजनाचे संचालन आणि देखभाल यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे आणि जिल्ह्यात जल जीवन मिशनचे काम प्रगती पथावर सुरू आहे. गावातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. तालुका फुलंब्री येथील निधोरा गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात येणार आहे. तसेच तालुका सोयगाव येथील ग्रामपंचायत किन्ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जल अर्पण दिवस गावात साजरा केला जाणार आहे.
यामध्ये गावातील पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात येणार आहे. गावात उत्सव साजरा करताना पाण्याचे महत्व ग्रामस्थांना कळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली, जल प्रतिज्ञा, गावाला मिळणारी शुद्ध पाण्याची हांडे सजवून गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे शुद्ध पाण्यासाठी (एफटीके) किटचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवकाचा सहभाग घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात गावातील जल जीवन मिशनचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी गावात जल अर्पण दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता शामकांत वारे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओम प्रकाश रामावत यांनी केले आहे.















